कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

अकलापूरात पारंपरिक जल्लोषात बैलपोळा!
शेतकऱ्यांचा लाडक्या सर्जा-राजाची सजूनधजून गावातून काढली मिरवणूक
नवनाथ गाडेकर/घारगांव
संगमनेर तालुक्यातील पठार भागात बैलपोळा उत्साहात साजरा होत असून, यंदा अकलापूर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला.
गावातील शेतकरी आपल्या सर्जा-राजाला नटवून थटवून एकत्र जमले होते. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बैलाला आकर्षक गोंडे, पायातील घुंगरांचा पट्टा, पाठीवर रंगीबेरंगी झुल, पितळी घंटा आणि प्लास्टिकच्या कवड्यांच्या माळांनी सजवलं होतं. सजलेल्या बैलांच्या थाटामाटाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
वाद्यांच्या गजरात मिरवणूक, गुलालाची उधळण
गावभर काढलेल्या भव्य मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, सनई-ताशांचा निनाद आणि लेझीमच्या तालावर ग्रामस्थांचा उत्साह उंचावला होता. गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी या जल्लोषात भर घातली.
व्हिडिओमिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला गुडघ्यावर बसून हनुमानरायांचं दर्शन घडवलं. त्यानंतर अकलापूर गावचे ग्रामदैवत स्वयंभू दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी बैलांना नेण्यात आले होते .या क्षणी संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारून गेला होता.
कृतज्ञतेचा दिवस – बैलपोळा
अकलापूरात गेल्या अनेक वर्षांपासून हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा टिकून आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा साजरा करतात. सकाळी सर्जा-राजाला अंघोळ घालून, सजवून, पूजा करून हा सण शेतकरी आणि बैलांमधील प्रेमाचा सोहळा बनतो.
“बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती आहे. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या या जीवावर आपण ऋणी आहोत. त्यामुळे बैलपोळ्याचा दिवस हा आमच्यासाठी कृतज्ञतेचा दिवस आहे.”
ग्रामस्थ अकलापूर
Comments
Post a Comment