संगमनेर/ तालुक्यात सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी जोर्वे-पिंपरणे रस्त्यावरील प्रवरा नदीच्या पुलावरुन एक मालवाहतूक करणारे वाहन वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या भयानक दुर्घटनेत वाहनचालकासह अन्य दोन प्रवाशीही वाहून गेले होते . याबाबतची माहिती मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी संगमनेर तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांनी तत्काळ आपल्या फौजफाट्यासह जोर्वे-पिंपरणे रस्त्यावरील पुलाकडे धाव घेत पाहणी केली. सदरील पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत दिसून आले होते तर निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सदरील पुलावरुन पाणी वाहत होते. त्यामुळे अशा प्रकारची दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली होती

त्यानंतर अशी माहिती समजली की, ओझर बु. येथील संदीप नागरे यांच्या घराचे काम सुरु आहे . त्यांच्याकडे सोमवार दिनांक 15 ऑगस्ट सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खिडक्यांच्या कांचा घेवून (एम.एच.15/एफ.व्ही.8943) हे पिकअप वाहन आले होते. त्यांच्या कांचा खाली करुन वाहनचालक कनोली मार्गे पिंपरणे रस्त्याने जोर्वेवरुन संगमनेरमध्ये जाणार असल्याची माहिती संबंधित वाहनचालकाने दिल्याची माहिती नागरे यांनी पोलिसांना दिली होती. हे वाहन नाशिकच्या सिडको परिसरात राहणार्या अस्लम अलिखान यांचे असल्याचे तपासात समोर आले . पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करुन वाहनाचा ठावठिकाणा विचारला असता त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर देत वाहनचालकाचे नाव प्रकाश (रा.जालना) असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी वाहनाच्या मालकाकडून चालकाचा मोबाईल क्रमांक घेत त्यांच्यावर संपर्क साधला असता तो संपर्क क्षेत्रात नसल्याचे उत्तर मिळाले. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास करतांना वाहनचालकाचा मोबाईल सुरु असतांना तो शेवटच्या क्षणी कोठे होता याची पडताळणी केली असता त्याचे शेवटचे लोकेशन कनोली असल्याचे समोर आले. त्यामुळे जोर्वे-पिंपरणे पुलावरुन वाहून गेलेले वाहन तेच असावे असा पोलिसांचा दाट संशय होता. या वाहनात चालक प्रकाश याच्यासह अन्य दोन प्रवाशीही असल्याची माहिती काहींनी दिल्याने या दुर्घटनेत वाहनासह एकूण तिघे वाहून गेल्याची भिती वर्तविली गेली होती. पोलिसांनी जोर्वे ते ओझर बंधार्यापर्यंतचा परिसर पिंजून काढला होता. त्याच बरोबर संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व तहसीलदार अमोल निकम यांच्याशी संपर्क साधून सदर वाहन व बुडीतांचा शोध घेण्यासाठी पाणबुडे देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने वरीष्ठ कार्यालयाला अहवाल पाठविला होता .त्यानुसार ठाणे महापालिकेचे TDRF आपत्ती व्यवस्थापन दल व सिन्नर येथील गोताखोर संगमनेरात दाखल झाले .प्रवरा नदीपात्रात या शोधपथकाने शोध घेतल्यानंतर अखेर आज पिक अप वाहण व वाहणात एक मृतदेह सापडला असून एक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. दरम्यान शोधमोहीम थांबवली असून उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.
तर या शोधमोहीमेसाठी ठाणे महानगरपालिकेचे TDRF ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, सिन्नर येथील गोताखोर गोविंद तुपे व स्थानिक पट्टीचे पोहणारे यांची मोलाची मदत लाभली.
Comments
Post a Comment